मेरा बाप संत था...मैं नही हूं!
- दिग्विजय जिरगे
चंद्रभानु गुप्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचा कल सिंडिकेट ग्रूपकडे झुकला होता म्हणजे त्यांनी सिंडिकेटला जवळ करण्यास सुरुवात केली होती. तर चंद्रभानु गुप्ता यांचे निकटवर्तीय बनारसीदास गुप्ता हे इंदिरा गांधी यांना भेटायला गेले होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना बसण्यासही सांगितलं नाही. बनारसीदास यांच्याकडे न पाहता फाईलीत डोकं घालून बसलेल्या इंदिरा गांधी या मान वरही न करता त्यांना म्हणाल्या, मेरा बाप संत था...मैं नही हूं! हा किस्सा सांगितलाय ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी...
भारतात रियल पॉलिटिक्सची सुरुवात इंदिरा गांधी यांनी केली. राजकारणाला आर्ट-सायन्समध्ये परावर्तीत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना पॉवरचं कॅरेक्टर चांगलं समजलं होतं. साम-दाम-दंड-भेदाच्या राजकारणाच्या त्या मास्टर होत्या, असे नीरजा चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी 'How Prime Ministers Decide' हे पुस्तक लिहिलं आहे. आपल्या पुस्तकात त्यांनी 6 पंतप्रधानांवर लिहिलं आहे. 600 पानांचं हे जाडजुड असं हे पुस्तक आहे. भारतीय राजकारणातील अनेक घटना, घडामोडींच्या त्या 'आय विटनेस' आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित अंजूम यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या पुस्तकाविषयी ऊहापोह केला आहे.
भारतीय राजकारणावर छाप सोडणाऱ्या अनेकांवर भरपूर लिखाण झालेलं आहे. त्यांच्याबद्दल आजही बोललं जातं. पडद्यामागे चालणाऱ्या गोष्टी, शह-काटशह वेगवेगळ्या पुस्तकातून वारंवार समोर आल्या आहेत. दरवर्षी अशी अनेक पुस्तकं बाजारात येत असतात. अनेकवेळा तर अशी पुस्तकं वाचूनही आपल्याला अनेक किस्से माहीत नसतात. पण या पुस्तकात हे राजकीय नेते निर्णय कसे घेतात किंवा त्यावेळची परिस्थिती याविषयी लिहिण्यात आलं आहे. या पुस्तकात इंदिरा गांधीविषयी काय म्हटलंय...
... तर मी राजकारण सोडून हिमालयात जाईन
त्यानंतर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आलं. पराभूत झालेल्या इंदिरा गांधी यांना त्यावेळी संजय गांधींबाबत खूप चिंता होती. देसाई सरकार संजय गांधी यांना जीवे मारेल अशी भीती त्यांना होती. जर मोरारजी सरकारने संजय यांना काही करणार नाही असा शब्द दिला तर मी राजकारण सोडून हिमालयात जाईल, असे इंदिरा गांधी यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
1977 मध्ये पराभूत झाल्यावर इंदिरा गांधी यांनी संजय यांना गोपनीयरित्या हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे तर राजीव गांधींना सोनिया आणि मुलांसह मुंबईला पाठवलं होतं. या सर्व गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
मोरारजी देसाई सरकार पाडून चौधरी चरणसिंह यांना पंतप्रधान करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी खूप प्रयत्न केले. चरणसिंह यांना घरी बोलावून त्यांचा सत्कार केला. आणि त्याच इंदिरा गांधी यांनी 23 दिवसांत चौधरी चरणसिंह यांचा पाठिंबा काढून त्यांचे सरकारही पाडले.
राजनारायण हे इंदिरा गांधी यांचे राजकीय विरोधक. पण नंतर त्यांनी त्यांच्याशीही जुळवून घेतले 1977 मध्ये याच राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव केला होता. 1971 पासून राजनारायण हे इंदिरा गांधी यांच्या मागे लागले होते. वेगवेगळ्या प्रकरणांत त्यांना कोर्टात खेचले होते. तेच राजनारायण आणीबाणी नंतरच्या काळात संजय गांधी यांच्या जवळ कसे गेले. इंदिरा गांधी यांना त्यांची गरज का भासली?
चामुंडा मातेचं दर्शन आणि संजय गांधींचा विमान अपघात
इंदिरा गांधी या चामुंडा मंदिरात जात असत. 1980 मध्ये जेव्हा त्या पुन्हा सत्तेवर आल्या. त्यावेळी शपथ घेतल्यावर 20 जूनला त्या चामुंडा दर्शनाला जाणार होत्या. परंतु, त्यावेळी तो दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे त्या मंदिराचे पुजारी खूप नाराज झाले होते. एखादा साधारण माणूस जर आला नाही तर एकवेळ देवी त्याला माफ करेल. पण शासकाने असं केलं तर देवी त्याला कधी माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
बरोबर 3 दिवसांनी संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांना दर्शनाला न गेल्याने असं झालं असेल का असंही वाटलं होतं.
77 मध्ये जेव्हा सत्तेवरुन पायउतार व्हावं लागलं. त्यावेळी एक वेगळ्याच इंदिरा गांधी त्यांच्या निकटवर्तीयांना पाहायला मिळाल्या. देसाई सरकार आपल्यावर वॉच ठेऊन आहे. टॅपिंग, बगिंग, सर्व्हिलयन्सची भीती त्यांना होती. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी त्या बंदिस्त खोलीत न करता, बाहेर बागेत येऊन बोलत असत.
नीरजा चौधरी म्हणतात की, हे पुस्तक मी युवा पिढीसाठी लिहिलं आहे. भूतकाळ वर्तमानाशी कसं लिंक आहे हे यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पॉलिटिक्स सस्पेन्स, पॉलिटिकल ड्रामा असं सर्व काही यात आहे. त्या त्या काळी घडलेल्या गोष्टींचा त्यात उल्लेख आहे. यात राजकीय इतिहास नाही किंवा नेत्यांचं आत्मचरित्र नाही. त्या त्या काळी पंतप्रधानांनी निर्णय कसे घेतले. त्यांच्यावर कशा पद्धतीचे प्रेशर असतात, लॉबी कशा काम करतात. त्यात पुन्हा देशातंर्गत आणि बाहरेची लॉबी कशी असते, कास्ट-कम्युनिटी यांचा पंतप्रधानांवर काय परिणाम होतो. या सर्व गोष्टींमध्ये पंतप्रधान कसे फसलेले असतात. पुन्हा त्यात त्यांचे इमोशनल इश्यूज काय असतात. अनेकवेळा अशा गोष्टींच्या नोंदी नसतात. ते या पुस्तकात आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा